Sunday, September 1, 2013

संस्कारांचा कित्ता













आजच्या प्रवाहात ओंडक्यासारखे वाहून चालणार नाही
संस्कारांचा कित्ता आपला तसाच गिरवून भागणार नाही |

नेहमी खरे बोलायचे शिकला असाल  
पण आजच्या जगाला ते पटणार नाही
किरकोळ खोटे तरी बोलायला हवे
त्याशिवाय हक्कच काय पण जीवसुद्धा वाचणार नाही |

आज्ञा पाळणे हेच कर्तव्य मानले असाल  
पण सोबतच्या माणसांनाच आज ते रुचणार नाही
काही आज्ञांना कानी पडूच द्यायचे नसते
असे नाही केले तर तुमचे अस्तित्वही कुणी जाणणार नाही |

'इथे तिथे' न पाहता नाकासमोर चालला असाल
नुसते सरळ चालून हा रस्ता कधी संपणार नाही
ज्याच्या समोर जातोय ते नाकही कधी खुपसावे लागते
त्याशिवाय ज्या गावी जायचेय ते नजरेसही पडणार नाही |

स्वतःलाही विसरून मदत करत हिंडला असाल
म्हणाल असे हिंडताना काटे कधी रुतणार नाही
पण काटा लागेल तेव्हा फक्त स्वतःचीच फुंकर असेल
कुणीच नसेल आजूबाजूस वा असूनही कुणी येणार नाही |

आजच्या प्रवाहात ओंडक्यासारखे वाहून चालणार नाही
संस्कारांचा कित्ता आपला तसाच गिरवून भागणार नाही |

- नम्रता

No comments:

Post a Comment